नांदेड - गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवा संघटनेने दोन्ही पक्षांची साथ सोडल्याचे जाहीर केले आहे. वीरशैव लिंगायत समाजाची संघटना असलेल्या शिवा संघटनेचे रौप्य महोत्सवी अधिवेशन नांदेडमध्ये पार पडले. या अधिवेशनाला शिवा संघटनेचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली.
लिंगायत समाजाचा मोठा जनाधार असलेली संघटना
दरम्यान शिवा संघटना इथून पुढे भाजप किंवा शिवसेनेसोबत असणार नाही, अशी घोषणा शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवा संघटनेला लिंगायत समाजाचा मोठा जनाधार आहे. लवकरच संघटनेची अधिकृत भूमिका जाहीर करणार आहोत. आता शिवा संघटना काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलासाठी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक