नांदेड- पाणी फाऊंडेशनचा २०१९ चा 'सत्यमेव जयते वॉटरकप' स्पर्धेचा निकाल व पुरस्कार वितरण सोहळा नुकताच आमिर खान व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यात भोकर तालुक्यातील कोळगाव बुद्रुकने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. श्रमदानातून नियोजित व प्रभावीपणे पाणी जिरवण्याचे व साठवण्याचे समाजोपयोगी काम केल्यामूळे गावाला हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात श्रमदानातून शेततळे तयार करणाऱ्या भोकर येथील सेवा समर्पण परिवाराचा फोटो झळकला.
भोकर येथील पत्रकार, मेडिकल असोसिएशनचे सदस्य, शिक्षक परिषद, राजकीय सामाजिक क्षेत्रातील समाजशील मंडळींनी एकत्र येवून सेवा समर्पण परिवार तयार केला. या परिवाराने भोकर तालुक्यातील आमदरी, पांडुर्णा, रेणापूर, पोमणाळा व कोळगाव बुद्रुक येथे अनघड बांध, आडवे चर व शेततळे खोदण्याच्या कामात गावकऱ्यांसोबत सहभाग नोंदवून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.
कोळगाव बु. येथे सतत ३० दिवस सकाळी ५ ते ९ या वेळेत श्रमदानातून १२/३० आकाराचे शेततळे तयार केले. पाणी फाऊंडेशनने कार्यक्रमात फोटो प्रसारित करून या कामाची दखल घेतल्याने व कोळगाव बु. ने पुरस्कार पटकावल्याने सेवासमर्पण परिवारातर्फे भोकरच्या दत्त गडावर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
भोकरच्या ऐतिहासिक दत्तगड व गणेश विसर्जणाच्या सुशोभिकरणाचे काम सध्या परिवाराने हाती घेतले असुन वरील प्रोत्साहनाने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. मागील सहा महिन्यांपासून सेवा समर्पण परिवार सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाभिमुख काम करत आहे. या कामात सेवा समर्पण परिवारामधील शिक्षक नेते बालाजी तुमवाड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, नारायण कुमरे, प्रा. डॉ. उत्तम जाधव, माधवराव पाटील वडगावकर, भगवान जोगदंड, गंगाधर तमलवाड, गजानन रेड्डी, प्रशांत जोशी, अशोक रेड्डी, अनिल जाधव, अंकुश हामद, रवी देशमुख, किशोर नरवाडे, किरण दशमुख, पत्रकार विठ्ठल फुलारी हे परिश्रम घेत आहेत.