नांदेड - कोरोनाची संचारबंदी आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांनी यंदा 'झेंडू'च्या लागवडीकडेच पाठ फिरवली. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झेंडूचे पीक काढून टाकावे लागले. झेंडूची लागवड व उत्पन्न कमी झाल्याने यंदा नवरात्र उत्सव दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर 'झेंडू' ला 'अच्छे दिन' आले असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे. सध्या साठ ते सत्तर रुपये दर मिळत असून शंभरी पार होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात अर्धापूर व मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुलशेती करतात. जिल्ह्यात गुलाब, झेंडू, डच गुलाब, बिजली, काकडा, शेवंती, जलबेरा आदी वेगवेगळ्या जातीच्या फुलांची लागवड करून शेती करतात. जिल्ह्यातील अनेक शेतकरी फुलांची शेती करतात. मात्र, यंदा लग्नसराईच्या काळातच कोरोनाने हाहाकार माजविला होता.
कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू झाल्यामुळे लग्न कार्य व सण-समारंभाला बंदी घालण्यात आली. यामुळे फुलांची मागणी बंदच झाली. फुल तोडणीच्या काळातच लॉकडाऊन झाल्याने फुले शेतातच वाळून गेल्याने नासाडी झाली. यावेळी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी फुलांचे मळे काढून टाकले. अनेक शेतकरी दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर 'झेंडू' च्या फुलांची लागवड करतात.
गतवर्षी तर शेतकऱ्यांना दर न मिळाल्यामुळे फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. त्यातच यंदा लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी झेंडूच्या लागवडीकडे पाठ फिरवली. मोठ्या अडचणीचा सामना तोंड देत, हिंमतीने झेंडू लागवड केलेल्या व पीक आणलेल्या शेतकऱ्यांना चांगले दर मिळू लागले आहेत.
नवरात्र, दसरा व दिवाळी या सणासाठी लागणारी फुलांची कमतरता भासू लागेल आणि फुलांचे भाव गगनाला भिडतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. गेल्या सहा महिन्यापासून अडचणीत सापडलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांनासाठी हे दिलासादायक वृत्त आहे.