नांदेड - दोन वर्ष कोरोनाच्या हाहाकारात गेले. अडीच हजार मृत्यू, सव्वा लाखाहून अधिक बाधित झाले. २०२२ साल हे मात्र कोरोना निर्बंधमुक्त गेले. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, यात्रा हे सर्व धुमधडाक्यात पार पडले. मात्र काही वाईट घटना देखील घडल्या. नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी ( Sanjay Biyani murder ) यांची ५ एप्रिल रोजी भरदिवसा घरासमोर दोघांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पाकिस्तानात दडून असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी कुख्यात मोस्ट वाँटेड हरविंदर संधू ( International Terrorist Harvinder Sandhu ) उर्फ रिंदाचा त्यात सहभाग उघड झाला. तो खूनाचा मास्टरमाईंड ठरला. एनआयए, आयबी, एटीएस तसेच ५ राज्यांचे पोलीस त्याच्या शोधात आहेत. अलीकडेच त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याची चर्चा असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. बियाणी खूनातील दोन्ही शार्पशुटरवर हरीयाणाच्या मोहाली येथे इंटलिजन्स ब्युरोचे मुख्यालय बॉम्बने उडवून दिल्याचाही आरोप आहे. संजय बियाणी यांचा हत्यानंतर व्यापारी वर्गात दहशत बसली होती. मात्र अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी 56 दिवसात तब्बल 16 आरोपीला अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई केली
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात - काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरु केलेली भारत जोडो पायदळ यात्रेची ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून महाराष्ट्रात एन्ट्री झाली. जिल्हयात ५ दिवस ही यात्रा मुक्कामी होती. हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणामार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात पोहोचली. पाच जिल्ह्यातून गेलेल्या या यात्रेत अखिल भारतीय व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी सहभागी झाले होते. जनसामान्यांचा उत्स्फूत प्रतिसाद या यात्रेला राज्यात मिळाला. यात्रेमुळे एकूणच काँग्रेसमध्ये नवचैतन्य आल्याचे चित्र पहायला मिळाले.भारत जोडो यात्रेने कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळाले स्फुरण
भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात - कन्याकुमारीपासून सुरु झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. हाती मशाल घेऊन लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक राहुल गांधी यांच्यासोबत होते. राज्यातील सर्वाधिक चार मुक्काम नांदेडात असलेल्या या भारत जोडो यात्रेने कार्यकत्यांची मने जोडण्याचेही काम केले. स्थानिक कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली. नव्या दमाच्या गड्यांना अधिक महत्त्व यात्रेत दिल्याचे दिसून येत होते. काँग्रेस संस्कृतीत ज्येष्ठांना पुढे केले जायचा पायंडा मोडीत काढून युवा नेत्यांना संधी दिली जात असल्याची जाणीव यात्रेतून झाली. तळागाळातील कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
तेलंगणा सीमेवरील ६६ गावांचा 'एल्गार' - महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये सीमावर्ती गावांच्या समावेशाचा वाद उफाळला असताना नांदेड जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. सीमावर्ती देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी, किनवट या तालुक्यातील तब्बल ६६ गावांना लगतच्या तेलंगणा राज्यातील अनेक कल्याणकारी योजनांची भुरळ पडली आहे. वर्षानुवर्षे महाराष्ट्र सरकारकडून गावाचा विकास होत नसल्याने आम्हाला तेलंगणा राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करीत या गावातील नागरिकांनी राज्य सरकारविरोधात जणू एल्गार पुकारला. त्यातील ४० गावच्या सरपंचांनी तर तसे पत्रच जारी केले. यागावातील नागरिकांची समस्या जाणून घेण्यासाठी समन्वय समितीने संवाद यात्राही काढली.
नांदेड जिल्ह्याचे राजकारण - महाविकास आघाडी सरकारमध्ये सेनेच्या आमदारांची कामे होत नसल्याने वैतागलेल्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. ते पहिल्या टप्प्यात जवळपास ३० आमदारांना घेऊन थेटगुवाहाटीला पोहोचले. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांचाही समावेश होता. कल्याणकर यांचे राजकीय गुरू हेमंत पाटील असल्याने त्यांनीच कल्याणकरांना शिंदे पाठविल्याचे आरोप झाले अन् काही दिवसांनी खासदार पाटील हेसुद्धा शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे कल्याणकरांचे राजकीय गुरू हेमंत पाटील हेच असल्याचा शिक्कामोर्तब झाला. दरम्यान, बंडखोरी केल्यामुळे आमदार बालाजीराव कल्याणकर गटात यांच्या घरासमोर दगडफेक करणारेच आज त्यांच्यामागे पुढे असल्याचेही पहायला दिसत आहे. अन् नांदेडचे मंत्रिपदही गेले महाविकास आघाडी सरकार जून २०२२ रोजी कोसळले आणि अशोकराव चव्हाण यांचे मंत्रिपद गेले. त्यांच्यावरच नांदेडच्या पालकमंत्री पदाची धुरा असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जिल्ह्याला झुकते माप दिले होते.
नवा पालकमंत्री मिळाला - सत्ता परिवर्तन झाल्यानंतर नांदेडला तीन महिन्यानंतर गिरीष महाजन यांच्या रूपाने पालकमंत्री मिळाले. परंतु पालकमंत्री म्हणून ते केवळ एकदाच नांदेडला आले. त्यांच्याकडे इतर जिल्ह्यांचीही जबाबदारी असल्याने त्यांना वेळ मिळत नाही, हे नांदेडकरांचे दुर्दैव आहे. त्यामुळे नवीन वर्षात पूर्णवेळ पालकमंत्री मिळेल, अशी अपेक्षा आहे.