नांदेड - मराठा समाजाला आरक्षण देवून त्याचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा तसेच शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने शुक्रवारी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रं. २२२ वरील अर्धापूर - मालेगाव - वसमत मार्गावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही वेळेसाठी या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीनंतर या समाजातील काही नेत्यांकडून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नांदेड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवुन मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अर्धापूर तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज देण्यात यावे, कर्जमाफी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा तसेच त्यांना नवीन पीक कर्जही देण्यात यावे, यावर्षीचा पीक विमा मंजूर करण्यात यावा, शेतातील विद्युत पुरवठा पुर्ववत करावा, शेतातील डी.पी व गावातील सिंगल फेज डी.पी. तत्काळ चालू करावे तसेच हाथरस अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनादरम्यान महामार्गावरील वाहतूक विस्कळीत काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती. यामुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.