नांदेड - जिल्ह्यात बनावट दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून अनेक ठिकाणी उच्च प्रतीच्या दारूमध्ये हलक्या प्रतीची दारू मिसळून तिची विक्री केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे राज्य सरकारचा महसूलही बुडत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - 'ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स 71 वा वाढदिवस भारतात साजरा करणार'
नांदेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालय केवळ दारू विक्रेत्यांकडून दरमहा हफ्ते वसूल करण्यात व्यस्त असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. तर काही ठिकाणी परराज्यातील दारूची विक्रीही खुलेआम पद्धतीने सुरू आहे. दारू विक्रेते अधिकचा नफा मिळवण्यासाठी हलक्या प्रतीची दारू उच्च प्रतीच्या ब्रँडच्या नावावर विकत असून हलक्या, मध्यम आणि महागड्या अशा सर्वच प्रकाराच्या दारूत भेसळ केली जात असल्याच्या तक्रारीही मद्यपी करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील काही बार आणि धाब्यावर या बनावट दारूची खुलेआम विक्री होत असल्याची कल्पना राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. मात्र, या प्रकरणाकडे डोळेझाक करण्याचा मोबदला मिळत असल्याची चर्चा आहे. खास करून दारू बंद असलेल्या दिवशी ही बनावट दारूच विक्रीस काढली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नांदेडमध्ये तेलंगणा, कर्नाटक सोबत गोवा राज्यातील दारूची विक्री होत असून या अवैध दारू विक्रेत्यांशी राज्य उत्पादन शुल्क खात्यातील कर्मचाऱ्याचे आर्थिक हितसंबंध असल्याचे म्हटले जात आहेत. या सर्व प्रकारातून राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत चालला असून, राज्य उत्पादन शुल्क खात्यातील कर्मचारी मात्र आर्थिकदृष्ट्या गब्बर ठरत आहेत. त्यामुळे या अवैध दारूप्रकरणी जिल्ह्यात अचानकपणे धाडसत्र राबवावे अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.