नांदेड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराने ऑनलाईन बुकींग आणि दर्शनाच्या बसेस बंद केल्या आहेत. गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षकांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांची गुरुद्वारामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सगळ्या सहा प्रवेशद्वारांवर ये-जा करणाऱ्या सर्व भाविकांचे हात साफ करण्यासाठी सॅनिटायजर्स दिले जात आहेत. याव्यतिरिक्त भाविकांनाही संख्या कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट
भक्त निवासातील सर्व ऑनलाईन बुकींग बंद केली आहे. गुरुद्वारा बोर्डातर्फे चालवल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद आहेत. सर्व भाविकांची थर्मल स्क्रीन टेस्टींग केली जात आहे. गुरुद्वारांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व स्थानिक बसेस रद्द केल्या आहेत. गुरुद्वारामध्ये वैद्यकीय पथकाची ही नियुक्त करण्यात आली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे आणि गुरुद्वारा बोर्डाने केलेल्या जागरुकतेमुळे येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत ८० टक्क्यांची घट झाली आहे. त्याच प्रमाणात देणगीही घटली आहे.