नांदेड - सिडको परिसरातील भर वसाहतीमधील वात्सल्यनगर सोसायटीमध्ये दुपारी बाराच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून दाचावार यांच्या निवासस्थानी लूट केली. यावेळी चोरट्यांनी तिजोरीत असलेले पन्नास तोळे सोने व नगदी दोन लाख रुपये लुटून नेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेतील संशयीत आरोपी हा परिवारातील सदस्य निघाल्यामुळे या चोरीला नाट्यमय वळण मिळाले आहे.
'चाकूचा धाक दाखवून लुटला ऐवज' -
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वात्सल्यनगर सोसायटीमध्ये राहणारे दाचावार परिवारातील दोन भाऊ दोन मजली इमारतीमध्ये वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. दुसऱ्या मजल्यावर रमेश दाचावार यांच्या निवासस्थानी जाऊन घरात उपस्थित अंकिता तीचा मुलाग साई याला चाकूचा धाक दाखवून तिजोरीतून ५० तोळे सोने-चांदी व नगदी दोन लाख रुपये, असा ऐवज लंपास केला. तसेच कपाटातील इतरही सामानाचीही नासधूस केली.
परिवारातीलच निघाला सूत्रधार -
चोरी केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर अंकिता यांनी या घटनेची माहिती आपल्या पतीला दिली. तसेच या घटनेची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यातही करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. सीसीटीव्हीची पाहणी केली. यावेळी पोलिसांना संशय आल्याने रमेश यांच्या चूलत भाऊ श्रीनिवास याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता. त्याने गुन्ह्याची कबूली दिली. तसेच पोलिसांनी अन्य एका संशयित आरोपीलाही या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - भाजपचे 50 टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुमचे? राहुल गांधींचा टोला