नांदेड - क्रेडीट कार्डचा ओटीपी क्रमांक घेवून एका युवकाच्या बँक खात्यातून सव्वा लाख रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बुक्तरे (रा. नवीनवाडी, पूर्णा रोड) यांना एका भामट्याने फसवले आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दहा महिन्यांपूर्वी एका भामट्याने विजय बुक्तरे यांना मोबाईलवर फोन केला. अॅक्सीस बँकेतून बोलत आहे, असे म्हणून बँकेतील क्रेडीट कार्डची मुदत संपली आहे. क्रेडीट कार्ड पुढे चालू ठेवण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारुन घेतला. तसेच बँकेच्या खात्यातील माहिती घेतली. त्यानंतर भामट्याने विजय बुक्तरे यांच्या बँक खात्यातून जवळपास सव्वा लाख रुपये काढून घेतले. आपल्या बँक खात्यातून पैसे उचलल्याचे लक्षात आल्यानंतर बुक्तरे यांनी बँकेत व पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी विजय बुक्तरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ आयटी अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साळुंखे हे करीत आहेत.