नांदेड- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा नवरात्री महोत्सव रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे, माहूर गडावरील नवरात्री महोत्सव यंदा भाविकांविना साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. असे असले तरी धार्मिक कार्यक्रम मात्र दरवर्षीप्रमाणे होणार असल्याची माहिती संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली.
नवरात्रोत्सव आला की राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे भाविकांची पावले आपोआप वळतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान आहे. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे, भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. परंतु, नवरात्रोत्सवात इथे जास्त गर्दी बघायला मिळते. माहूरगडावरील नवरात्री महोत्सव अवघ्या चार ते पाच दिवसांवर आला आहे. त्यामुळे, याबाबत काय निर्णय होतो, याकडे लाखो भाविकांचे लक्ष लागले होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व भाविकांविना साजरा करण्याचा निर्णय संस्थानच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
माहूर गडावरील श्री. रेणुका देवी संस्थानवर नवरात्र महोत्सव होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाविक आणि हातावर पोट असणाऱ्या लघू व्यावसायिक आणि पुजाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
नवरात्रीत असते लाखो भाविकांची गर्दी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्री महोत्सवात लाखो भाविक येत असतात. महोत्सवाच्या १० दिवसात संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यासह देशभरातून दररोज लाखो भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर येथे येत असतात. यामध्ये ललित पंचमी, नवरात्रीतील मंगळवार, शुक्रवार व रविवार या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. अश्विन पोर्णिमेला तर भाविकांची प्रचंड गर्दी असते. शिवाय, घटस्थापनेपूर्वी दिपज्योत नेण्यासाठीही युवकांची मोठी गर्दी होते.
हेही वाचा- कंधार लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी