नांदेड - कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून माहूर येथील रेणुकादेवी, दत्तशिखर, देवदेवेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, सर्व धार्मिक संस्थानाचे प्रमुख व पत्रकारांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
कोरोनासंदर्भात आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी माहूर तालुक्यात बैठक घेतली. बैठकीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वाघमारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव भिसे यांनी यावेळी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाची माहिती दिली. तर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी नगरपंचायत प्रशासन, पंचायत समिती, धार्मिक संस्थाने यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना स्थगिती दिली. गर्दी जमा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तालुका प्रशासनाने तालुकास्तरीय पथकाची स्थापना करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या नगर पालिका, पंचायत समिती, आरोग्य विभागाचे प्रत्येकी एक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
रेणुकादेवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा चैत्र नवरात्र उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. तालुका प्रशासनाने शहरातील खासगी शिकवणी वर्ग व व्यायाम शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नगरपंचायतला दिले. त्याचबरोबर उघड्यावरील मांसविक्री मंगल कार्यालय व धर्मशाळा येथील आयोजित सर्व कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
माहूर येथील रेणुकादेवी मंदिर आज सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढील आदेशांपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर सर्व शक्तीपीठे कालपासूनच बंद ठेवण्यात आली आहेत. माहूरचे रेणुकादेवी सर्व प्रशासकीय अधिकारी असताना मंदिर हे वराती मागून घोडे या उक्तीप्रमाणे एक दिवस उशिरा बंद करण्यात येत असल्याचे बैठकीत दिसून आले.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील न्यायिक कामकाजाच्या वेळेत बदल