नांदेड - नरेंद्र मोदी हा अगोदर वेगळाच माणूस होता. पंतप्रधान झाल्यानंतर वेगळाच दिसला. मोदींनी केसाने गळा कापून जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड येथे केली. राज ठाकरे यांनी भाषणात भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.
शहरातील नवा मोंढा येथील मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. खूप बोलले काहीच केले नाही. मोदी सतत निवडणुकीच्या मूडमध्ये असतात. मोदी नांदेडला आले होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांबदल, बेरोजगारी बद्दल काहीच बोलले नाही. आपण केलेल्या कामावर मत न मागता, ते जवानांच्या नावावर मत मागत आहेत, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
मराठवाड्यात मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. हेच का अच्छे दिन. मराठवाड्यात पाण्याची पातळी प्रचंड खोल गेली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ५० ते ६० वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. सरकार मात्र लाखो विहिरी बांधल्याचे म्हणतंय. पण त्या विहीर दाखवायला तयार नाहीत. जनतेने भरभरून मत देऊनही सतत खोट बोलत आहेत. जेवढ्या गोष्टीवरती हजारो कोटी रुपये खर्च केले. त्यापूर्णच झाल्या नाहीत. त्याबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत, असे ते म्हणाले.
राज म्हणाले, मी कोणाच्या प्रचारासाठी आलो नसून भारताच्या राजकीय क्षितिजावरून मोदी-शाह यांचे नाव काढून टाकण्यासाठीच मी नांदेडात आलो आहे. हे दोघे निवडणूक जवळ येईल, तशी ते युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करतील, असे मी आधीच म्हटले होते आणि झालेही तसेच, जवानांच्या नातेवाईकांनी पुरावे मागितले तर देशद्रोही म्हणतात. आम्हाला सैन्यावर विश्वास आहे. वैमानिक त्यांचे काम बजावून आले. मात्र, जागा कोणती होती, हे महत्वाचे आहे. मदरसा आजही तिथे आहे. हे सरकार आमच्याशी खोट का बोलत आहेत. सत्य परिस्थिती समोर आणली जात नाही, असेही ते म्हणाले.
राजीव गांधीनंतर बहुमत देणाऱ्या नरेंद्र मोदीनी देशातील जनतेचा खोट बोलून भ्रमनिरास केला. निवणुकीपूर्वी विरोध केलेल्या अनेक बाबी सत्तेत आल्यानंतर लागू केल्या. शिव्या घालण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोला. मोदी-शाहांची नीती ही देशाला रशियाकडे घेऊन जाण्याकडे आहे. मोदी-शाहांना केवळ ७-८ लोकांच्या हातात देश द्यायचा आहे. हिटलरशाही आणण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
मोदींना गोदावरी नदीचे पाणी गुजरातला घेऊन जायचे आहे. महाराष्ट्रतील सरकार काहीच बोलत नाहीत. स्वतःच्या हितमीवर बसणारा मुख्यमंत्री बोलू शकतो. मात्र, बसवलेला मुख्यमंत्री काहीच बोलू शकत नाही. बीडमध्ये गर्भाशय काढून विकला जात आहे. हा चौकीदार काय करत आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. यावेळी नितीन सरदेसाई, बाळा नांदगांवकर, अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात कोठेही उमेदवार उभा केलेला नाही. आपल्या पक्षाचा पाठिंबा कोणालाही नाही, असे जाहीर करूनही ते भाजप विरोधात जोरदार मोहिम राबवत आहेत. देशात सध्या निर्माण झालेल्या स्थितीवर बोलण्याचा मला आणि माझ्या पक्षाला अधिकार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला होता. त्याच अनुषंगाने ठाकरे यांनी राज्यातील निवडक ठिकाणी जाहीर सभा घेण्याचे मागच्या आठवड्यात जाहीर केले होते. राज ठाकरे काय बोलणार, कोणत्या उमेदवाराच्या आणि पक्षाच्या बाजुने आपल्या भाषणाचा कल ठेवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.