नांदेड - दुष्काळग्रस्त असलेल्या नांदेड जिल्ह्यात श्रावण सरींनी रात्रभर हजेरी लावली. या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे खरीप हंगामाला जीवदान मिळाले आहे.
खंडित पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र रात्रभर बरसलेल्या या पावसामुळे पिकांना नवचैतन्य मिळाले आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. या पावसामुळे वाया जाणाऱ्या खरीप हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडणार असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
रात्रभर बरसत असलेला रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस पिकांसाठी अमृतदायी ठरला आहे. मात्र, जिल्ह्यात जलसाठे भरण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.