नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा फटका नांदेड जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकारांना बसला आहे. ऐन लग्नसराईत कोरोनामुळे व्यावसायिक छायाचित्रकारांचे काम ठप्प पडले आहे.
जिल्ह्यात हजारो छायाचित्रकार असून त्यातील शेकडो छायाचित्रकारांची उपजीविका ही फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरच चालते. यंदा ऐन लग्न सराईच्या तोंडावर कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने जगभरात थैमान घातले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक छायाचित्रकारांचा व्यवसाय ठप्प असून सर्वच जण चिंतेत आहेत.
यामध्ये छायाचित्रकारांसह, फोटो कलर लॅबमध्ये काम करणारे कामगार, अल्बम डिझाईन करणारे कामगार यांच्यासह अनेक लोकांची सध्या परवड होत आहे. लाखो रुपये कॅमेरा खरेदीत गुंतवून ठेवलेल्या छायाचित्रकारांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छायाचित्रकारांनाही राज्य शासनाने मदत करावी यासाठी नांदेडच्या फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र सुर्वे यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. सर्व व्यावसायिक छायाचित्रकारांना मुख्यमंत्र्यांनी मदत करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.