नांदेड - ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश कौडगे यांची निवड करण्यात आली आहे. कौडगे यांच्या मनसे प्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेच्या वाढीला आता चालना मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
सेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख -
प्रकाश कौडगे यांची शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख होती. सेनेत असताना त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली होती. इथपासून जिल्हा प्रमुख पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. मात्र, सेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे मागच्या काळात सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता कौडगे यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
कौडगे यांचे नांदेडात जोरदार स्वागत -
कौडगे यांच्या मनसे प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रकाश कौडगे यांचे नांदेडमध्ये आज जोरदार स्वागत करण्यात आले. नांदेडमध्ये येताच कौडगे कामाला लागले असून ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. कौडगे यांच्या मनसे प्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेच्या वाढीला आता चालना मिळेल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे आपले पॅनल उतरवणार असल्याचे कौडगे यांनी सांगितले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आता चुरस निर्माण होणार आहे.
हेही वाचा - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नाशिकहुन शेतकरी रवाना