नांदेड - शहरातील मेट्रो शूज आणि शंकरराव चव्हाण चौकातील बार लुटणाऱ्या कुख्यात दरोडेखोराला पोलिसांनी गोळ्या घातल्या आहेत. हा थरार आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नांदेड-भोकर रोडवरील येळेगाव शिवारात घडला.
हेही वाचा- दुष्काळासह मंदीच्या फेऱ्यातील वाहन उद्योगाला सणांमधून मिळाली 'संजीवनी'
अनेक दिवसांपासून पोलीस शेरसिंगच्या मागावर होते
शहरातील श्रीनगर परिसरातील मेट्रो शूजमध्ये बंदुकीचा धाक दाखवून शेरसिंग उर्फ शोरू याने लुट केली होती. तसेच नांदेड शहरालगत असलेल्या डॉक्टर शंकराव चव्हाण चौक परिसरातील एका बारमध्येही त्याने दरोडा टाकला होता. बंदुकीचा धाक दाखवून दोन्ही ठिकाणी मोठी रक्कम त्याने लुटली होती. तसेच अनेक गुन्ह्यामध्ये त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप होते. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.
हेही वाचा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन
शेरसिंग आणि पोलिसांत चकमक
आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नांदेड-भोकर रोडवरील येळेगाव शिवारातील एका आखाड्यावर तो लपून बसल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती.पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकाची शेरसिंग उर्फ शोरू सोबत चकमक झाली. यात दोन्हीकडूनही गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये शेरसिंग व अन्य एक जण जखमी झाला आहे. सदरील जखमी आरोपीस नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.