नांदेड - कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असले तरी, अद्याप लस शोधण्यात यश आलेले नाही. परंतु, प्लाझ्मा थेरपीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ही थेरपी आता नांदेडमध्येही उपलब्ध झाली आहे. विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या दोघांनी प्लाझ्मा दान केला आहे.
एका प्लाझ्मातून दोन रुग्णांना जीवदान मिळू शकते. संपूर्ण जगात कोरोनावर लसीसाठी संशोधन सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात येत आहे. परंतु, आतापर्यंत कोरोनावर खात्रीशीर लस किंवा औषध मिळाले नाही. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. त्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार हे बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. ही उपचारपद्धती अधिक खर्चिक आहे. मात्र, आता ही उपचारपद्धती नांदेडातील सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली आहे. ही उपचारपद्धती उपलब्ध होताच कोरोनामुक्त झालेल्या दोघांनी शासकीय रुग्णालयात आपला प्लाझ्मा दान केला आहे.
आणखी आठ ते दहा जणांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. गरजेनुसार त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी बोलाविण्यात येणार आहे. एका प्लाझ्मामुळे कोरोनाच्या अत्यवस्थ अशा दोन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२८ दिवसांनी प्लाझ्मा करू शकतो दान -
लक्षणे असलेला कोरोना रुग्ण बरा झाल्यावर २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करू शकतो. त्याच्या शरीरातून केवळ ५०० मीलीलिटर प्लाझ्मा घेतला जातो. त्यातून २०० मीलीलिटरच्या २ प्लाझ्मा बॅग तयार केल्या जातात. या २ बॅग २ गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. हा प्लाझ्मा उणे ४० अंशापेक्षा कमी तापमानात ठेवला जातो. एक वर्षापर्यंत हा प्लाझ्मा केव्हाही वापरता येवू शकतो. जसे रक्तदान तसेच प्लाझ्मा दान करण्याचे नियम आहेत.
१८ वर्षांवरील बरा झालेला रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतो -
प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीचे वजन किमान ४० किलो आणि वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे. दान करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे असायला हवीत. ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. अशा लोकांना प्लाझ्मा दान करता येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.