नांदेड - पावसाअभावी कोरडी पडलेली पैनगंगा नदी रिमझिम पावसामुळे आजपासून पुन्हा एकदा प्रवाहित झाली आहे. त्यामुळे पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा पुन्हा कोसळू लागला आहे.
दरवर्षी जूनमध्येच धो-धो कोसळणारा धबधबा यावर्षी पावसाअभावी कोरडा होता. आज पहिल्यांदाच या धबधब्याला पाणी आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सहस्रकुंड धबधब्याकडे लगेच धाव घेतली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात का होईना सहस्रकुंड प्रवाहित झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. नांदेड व यवतमाळसह हिंगोली जिल्ह्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या तरी पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.