नांदेड - किनवट शहरातील सुभाषनगर शाळेने जवळपास ८ वर्षापासूनचे थकीत भाडे न दिल्यामुळे इमारतीच्या मालकाने शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शाळेच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांना उघड्यावर आणि उन्हात बसून शाळा उघडण्याची प्रतीक्षा करावी लागली आणि घरी परतावे लागले.
या प्रकरणानंतर शिक्षण विभागाने ही शाळा दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, शाळा ज्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे, ते ठिकाण खूपच दूर असल्यामुळे पालकांनी त्याला विरोध केला आहे. तसेच शाळेला जाताना-येताना पाण्याचा नाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सोयीचे नाही. त्यामुळे याच ठिकाणी पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.