नांदेड - जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभेचे आमदार असलेले प्रतापराव पाटील-चिखलीकर हे सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. चिखलीकरांच्या या जागेवर त्यांचे मेहुणे आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे., तर दुसरीकडे खासदार चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील-चिखलीकर यांनीही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्यामुळे, भाजपकडून उमेदवारीसाठी चिखलीकर कुटुंबातच गृहकलह सुरू झाल्याचे चित्र आहे. यामुळे या दाजी भावजीच्या रस्सीखेचात उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोहा-कंधार मतदारसंघाचा राजकीय इतिहास
स्वातंत्र्यानंतरच्या झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई होत असे. एकेकाळी विधानभवन गाजवणारे भाई केशवराव धोंडगे, यांचा मतदारसंघ म्हणून लोहा-कंधारची ओळख आहे.
हेही वाचा... बीडच्या राजकारणात महिलांचा दबदबा; प्रश्न मात्र आजही कायम
२००४ साली या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर हे पहिल्यांदा निवडून आले होते. तिथपासून चिखलीकर यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे हे विजयी झाले होते. धोंडगे यांनी पाटील यांचा केवळ नऊ हजार मताने पराभव केला होता. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेकडून प्रताप पाटील आणि भाजपकडून मुक्तेश्वर धोंडगे मैदानात होते. यावेळी मात्र ४५ हजारांचे मताधिक्य घेत प्रतापराव पाटील विजयी झाले.
लोहा-कंधार हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभेत येतो. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपला मताधिक्य मिळाले आहे. यावेळी लोहा-कंधारचे आमदार असलेले प्रताप पाटील-चिखलीकर हेच नांदेडचे खासदार म्हणून नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे आता प्रतापरावांच्या अनुपस्थितीत लोहा-कंधार विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोहा कंधारमध्ये भाजपकडून पाटील यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र भाजपकडून श्यामसुंदर शिंदे, प्रणिता देवरे यांचीही नावे चर्चेत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांच्यामध्ये आणि खासदार चिखलीकर यांच्यामध्ये चांगलेच वाक्-युद्ध पेटल्याचे चित्र आहे. खुद्द पाटील यांनी मात्र अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
हेही वाचा... श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?
यातच लोहा कंधार मतदारसंघ युती झाल्यास शिवसेनाला सुटेल की भाजपाला, हे अजून निश्चित नाही. काही दिवसांपूर्वी शिंदे कुटुंबीयांची पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेला ऐनवेळी हा मतदारसंघ जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
शिवसेनेकडून मुक्तेश्वर धोंडगे यांचा उमेदवारीचा दावा कायम आहे. शिक्षण संस्थांचे मोठे जाळे असणाऱ्या मुक्तेश्वर धोंडगे यांच्याकडे मनुष्यबळ भरपूर आहे, पण त्यांचा वापर त्यांना करता आला नाही, त्यामुळे ते आजवर अयशस्वी झाले, असे बोलले जाते. यावेळी मात्र त्यांनीही कंबर कसली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी गृहीत धरुन शंकर धोंडगे, हे प्रचाराच्या कामाला लागले आहेत. यासाठी हा संपूर्ण मतदारसंघ धोंडगे यांनी पिंजून काढला आहे. शेतकरी चळवळीतील एक धाडसी कार्यकर्ता म्हणून शंकर धोंडगेंना मतदारसंघात सहानुभूती असते, मात्र ही सहानुभूती मतात परिवर्तीत करणे गरजेचे आहे.
हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'
काँग्रेसकडून रोहीदास चव्हाण, अनिल मोरे, बालाजी पांडागळे, संजय भोशीकर यांची नावे चर्चेत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडुन संजय बालाघाटे, शिवा नरंगले, विनोद पापिनवार, यांची नावे चर्चेत आहे. शिवसेनेचे नेते तथा लिंगायत समाजाचे बडे प्रस्थ असलेले प्रा. मनोहर धोंडे हे देखील येथून निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. शिवा या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे मोठे संघटन लोहा-कंधार तालुक्यात निर्माण झाले आहे.
लोहा कंधार मतदारसंघाच्या समस्या
कायम दुष्काळ असलेले लोहा आणि कंधार हो नांदेड जिल्ह्यातील प्रमुख तालुके आहेत. अपुऱ्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे नेहमीच हाल होत असतात. मात्र मानार प्रकल्पामुळे काही प्रमाणात येथील सिंचनाची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. सध्या या मतदारसंघात रस्त्यांचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. नागपुर-तुळजापुर हा राष्ट्रीय महामार्ग याच भागातून जात असल्याने दळणवळणाच्या सुविधा वाढतील, अशी अपेक्षा आहे. आरोग्य, शिक्षणाच्या बाबतीत सुविधांच्या बाबतीत मात्र येथे अभाव आहे.
हेही वाचा... खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला