नांदेड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्व साधारण सोमवारी सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी जवळपास २५ ते ३० सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये विषय समितीव्यतिरिक्त अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यामुळे गोंधळ उडाला होता.
विजय धोंडगे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. एकंदरीत गोंधळामुळे सभा बारगळली, तर काही भागांत नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे आवाज येत नव्हता. त्यामुळे गोंधळ उडाला. कोरोना विषाणूच्या मुद्यासह शाळा सुरू करण्याच्या कारणावरून अनेक सदस्यांनी सभापती व अध्यक्षांना धारेवर धरले. शाळा उघडण्यासाठी तारीख निश्चित करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना काही सदस्यांनी दिल्या. यावेळी जि. प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर हे संतापले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा रेड्डी, सभापती संजय बेळगे, बाळासाहेब रावणगावकर, राम नाईक, सुशीलाबाई बेटमोगरेकर, सचिव सुभाष ठोंबरे आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे यांनी अनेक विषयांवर अध्यक्षा आबुलगेकर यांना धारेवर धरले, तर जिल्ह्यातील अनेक जि. प. सदस्य यांनी विविध विषयांवर चर्चा केली.