नांदेड - नांदेडमध्ये रात्री उशिरा गुन्हेगाराच्या दोन गटात गोळीबार झाला आहे. त्यात विक्की चव्हाण नावाच्या गुन्हेगार ठार झाला आहे. शहरातील गाडेगाव रोडवर रात्री हत्येचा हा थरार घडला आहे. विक्कीचा मृतदेह हस्सापूर शिवारात सकाळी आढळला. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकी जप्त केली. तसेच तीन आरोपिंना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, यातील मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
हल्लेखोरांनी कुख्यात गुंड विक्की चव्हाण याच्यावर गोळीबार करून त्याला ठार केले. प्रारंभी विमानतळ ठाण्याच्या हद्दीतून आरोपींनी चारचाकी वाहनातून जखमी असलेल्या चव्हाणला लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हस्सापूर शिवारात नेवून फेकून दिले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार खंजीर जप्त केला आहे. या प्रकरणात तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
रविवारी (दि. 2 ऑगस्ट) रात्री विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शंकरराव चव्हाण चौक गाडेगाव रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली. आरोपींनी अनेक गुन्हे दाखल असलेल्या विक्की चव्हाण याच्यावर गोळीबार केला. तेथून चारचाकी वाहनातून त्याचा मृतदेह लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हस्सापूर शिवारात एका शेतात नेवून फेकला. सोमवारी सकाळी 6 वाजता हा मृतदेह विक्की चव्हाण याचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी विक्की चव्हाण याची दुचाकी आढळून आली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून घटनास्थळी रात्रीच पोलिसांनी भेट देवून सर्वत्र नाकाबंदी केली होती. विक्की चव्हाण याच्याविरुध्द लिंबगाव पोलीस ठाण्यात 1 ऑगस्टला दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हेगारांच्या एका मोठ्या टोळीत फुट पडली असून अंतर्गत मतभेदातून ही गँगवारची घटना घडल्याचे कळते.