नांदेड - खानापूर फाट्याजवळ कंटेनर आणि टेम्पोची समोरा-समोर धडक होवून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (२३ जानेवारी) घडली.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी उभारली जाणार हेलिपॅड
नांदेडकडून लोखंडी कपाट घेऊन येणारा टेम्पो (एम. एच 26 बी ई 3447) तेलंगणातील बिच्कुंदाकडे जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात हैदराबादहून नांदेडमार्गे सुरतकडे जाणाऱ्या कंटेनरची (एम.एच 04 जे के 7124) समोरा-समोर धडक झाली. या अपघातात टेम्पो चालक माधव धोंडीबा हनुमंते (वय २२ रा. माळकौठा ता.मुदखेड) हा जागीच ठार झाला. तर, कंटेनर चालक गजानन गंगाधर डोईफोडे (रा.मंग्याळ ता. मुखेड) हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी
हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहने धडकल्यानंतर टेम्पोच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. तर, कंटेनरचे मागील डब्बे रस्त्यापासून वीस फूट दूर फेकले गेले. मृत टेम्पो चालकाचा मृतदेह शवविच्छेदन करून त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृताचे वडील धोंडीबा शंकर हनुमंते यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.