नांदेड - उमरी तालुक्यातील शिरूर येथे एका वयोवृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. तसेच तिच्या अंगावरील जवळपास एक लाख रुपयांचे दागिने पळवून नेले. कृष्णाबाई पुंडलिक पडोळे (८५) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा... राज्यात लवकरच 'दिशा' कायदा; तीन सदस्यांची समिती स्थापन
ही वयोवृद्ध महिला घरी एकटीच राहते. मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या अंगावरील जवळपास एक लाख रुपयांचे दागिने पळविले. गावातील एका व्यक्तीला त्या महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर त्याने या घटनेची माहिती सरपंच शेख बाबू यांना दिली. त्यानंतर या घटनेची माहिती उमरी पोलिसांना देण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
कृष्णाबाई पडोळे ही वयोवृद्धा घरी एकटीच राहत होती. ती घरात एकटी असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी तिचा गळा आवळून खून केला आणि तिच्या अंगावरील दागिने पळविले. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.