नांदेड - नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली शासकिय कार्यालय नांदेड येथेच असावीत यासाठी माझा कायम आग्रह राहिलेला आहे. मागील काही वर्षात निर्माण झालेला अनुशेष पूर्ण करण्याच्यादृष्टिने सर्व विभागाशी समन्वय साधत नांदेडसाठी कोणतेही कमतरता पडणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते स्नेहनगर नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम, विद्युत शाखेच्या अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कार्यालयाचे लोकार्पण आणि शासकिय विश्रामगृह नांदेड येथील मिनी सह्याद्री विश्रामगृहाची सुधारणा, नुतनीकरण व श्रेणीवर्धन कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदेड शहरातील विश्रामगृहाचे नूतनीकरण करणार
नांदेड येथे पूर्वी जलसंपदा विभागाचे विश्रामगृह होते. हे विश्रामगृह नादुरुस्त व बंद असल्यामुळे स्वाभाविकच विविध अभ्यागतांची गर्दी सध्या उपलब्ध असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विश्रामगृहावर वाढली आहे. जिल्ह्यातील 16 तालुके, याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या अभ्यागतांची संख्या लक्षात घेता नांदेड येथे विश्रामगृहाची अत्यंत आवश्यकता होती. सर्व बाबींचा विचार करुन आता आपण मिनी सह्याद्री विश्रामगृह व तपोवन विश्रामगृहाची सुधारणा, नुतनीकरण, श्रेणीवर्धन करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कार्यालय लांबणीवर असल्यामुळे कामांना होत होता विलंब
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणाऱ्या इमारत विकास कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचाही तेवढाच महत्वाचा सहभाग असतो. यापूर्वी नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय उस्मानाबाद तर अधिक्षक अभियंत्यांचे कार्यालय पुणे येथे होते. यामुळे येथील विकास कामात विलंब होण्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर विभागांना सारखे उस्मानाबाद व पुणे येथे जाणे जीक्रीचे झाले होते. जिल्ह्याची ही निकड लक्षात घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनी कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता विद्युत शाखेच्या कार्यालयाचे लोकार्पण करुन नांदेडच्या विकासात एक नवी भर घातली आहे.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर रोहिनी येवनकर, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, हरिहरराव भोसीकर, मुख्य अभियंता (विद्युत) संदिप पाटील, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.