नांदेड - नांदेड-नागपूर महामार्गावर नांदेड-हिंगोलीवरील हिवरा पाटीनजीक सीमेवर येऊन वाहने थांबत आहेत. सीमेवर हिंगोली जिल्ह्यातील पोलिसांकडून चांगलीच अडवणूक होत आहे. प्रसंगी लाठ्यांचाही वापर केला जातो. त्यामुळे नांदेडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाचा वाढता कहर पाहता संपूर्ण देशात 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. या बंदीचे सर्वांनी स्वागतच केले आहे. नागरिकांना जिथे आहेत तिथेच राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, नागरिक आपआपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. नांदेड-हिंगोली सीमेवर हिंगोली पोलीस मात्र चोख कर्तव्य बजावताना दिसत आहे. मात्र, काहीवेळा त्यांच्याकडून नर्स आणि पत्रकारांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांनी जपली माणुसकी -
गोरगरीब जनतेची अडवणूक होत असल्याची माहिती मिळताच अर्धापूर नगरपंचायतचे गटनेते अॅड. किशोर देशमुख यांनी भेट दिली. सुरुवातीला या लोकांना जेवणाच्या साहित्याचे वाटप केले. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, वसमतचे आमदार राजुभैया नवघरे आणि खासदार राजीव सातव यांच्याशी संपर्क साधून या लोकांची अवडणूक होत असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. तसेच प्रशासनास बोलून मार्ग काढावा, अशी विनंती केली. यावेळी तातडीने या सर्वांनी याबाबत प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित लोकांना अडचण व त्रास होऊ नये, अशा सूचना केल्या. साहित्याचे वाटप करताना अॅड. किशोर देशमुख, सखाराम क्षीरसागर, विलास साबळे, अजित गटाणी आदी उपस्थित होते.