नांदेड - जिल्ह्यात आज रविवार सांयकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 30 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 28 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. तर, 2 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 146 झाली आहे. रविवार 31 मे रोजी पंजाब भवन कोव्हीड केअर सेंटर येथील एक पुरुष रुग्ण बरा झाला असून आतापर्यंत 104 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात उर्वरीत एकूण 34 रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत.
मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील 2 नवीन पॉझीटिव्ह रुग्ण पुरुष असून एकाचे वय 27 तर, दुसरा व्यक्ती 32 वर्षीय आहे. त्यांच्यावर मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. औषधोपचार चालू असलेल्या 4 रुग्णांपैकी 2 स्त्री रुग्ण आहेत. यातील एक महिला ही 52 वर्षीय तर, दुसरी महिला रुग्ण ही 65 वर्षीय आहे. तर, दोन पुरुषांपैकी एकाचे वय वय 38 तर, दुसरे 80 वर्षीय वृद्ध असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
कोरोना रुग्णांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे -
सर्वेक्षण - 1 लाख 39 हजार 674,
घेतलेले स्वॅब - 3 हजार 890,
निगेटिव्ह स्वॅब - 3 हजार 378,
आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - 2,
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 146,
स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या - 148,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 27,
मृत्यू संख्या - 8,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 104,
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - 34,
स्वॅब तपासणी चालू रुग्णसंख्या - 187 एवढी आहे.
शनिवार 30 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 152 स्वॅब तपासणी अहवालांपैकी 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 122 अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील, अशी माहिती आहे. रविवारी 65 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल सोमवार 1 जून रोजी सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 146 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 104 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 34 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोव्हीड केअर सेंटर येथे एकूण 14, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथील कोव्हीड केअर सेंटर येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सावध करेल, असेही डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.