नांदेड - ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ भोकरफाटा येथील चौकात राष्ट्रवादी व युवक काँग्रेसच्या वतीने नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिकात्मक म्हणून टरबूज फोडून निषेध व्यक्त केला. यावेळी अर्धापूर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना काही काळ अटक केली होती.
हेही वाचा - नांदेड उत्तर मतदारसंघात तिकीट कोणाला द्यायचं; महायुतीला पडला प्रश्न
राज्य शिखर बँकेतील घोटाळाप्रकरणी ईडीने शरद पवार आणि अजित पवरांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर भोकरफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा - परदेशी जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या ग्राहकाचे पैसे खात्यातून लंपास
भाजप हे सूडबुद्धीचे राजकारण करत आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही, अशी टीकाही यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक संतोष गव्हाणे, जिल्हाध्यक्ष वसंत सुगावे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, विधानसभा अध्यक्ष मदन कल्याणकर, उद्धवराव राजेगोरे, अॅड. सचिन देशमुख, शिवानंद पाटील शिप्परकर, अॅड. सचिन जाधव, चंद्रकांत टेकाळे, बाळासाहेब टेकाळे, गोविंद महाराज गोदरे, अमोल राजेगोरे, गजानन कदम, विलास देशमुख, शेरु पठाण, विश्वनाथ गव्हाणे, महेश राजेगोरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.