नांदेड : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तळा-गाळापर्यंत पाहोचविण्यासाठी तसेच सावित्रींच्या लेकींना आत्मनिर्भर करण्यासाठी वर्षभर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबाबत माहिती दिली. आज जिल्हा परिषदेत सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी वर्षा ठाकूर घुगे यांनी वेबिनारव्दारे जिल्हयातील सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या रोल मॉडेल..
पुढे त्या म्हणाल्या, गावस्तरापासून अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर तसेच विविध महिला अधिकारी व कर्मचारी नोकरी करुन घराची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आपल्या रोल मॉडेल असून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे कार्य पुढे नेणे आज काळाची गरज आहे.
जि. प. विविध कार्यक्रम राबविणार..
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचा जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व उपाध्यक्षा पद्मारेड्डी सतपलवार यांचा मानस आहे. त्यानुसार महिलांसाठी कार्यशाळा, आरोग्य तपासणी, महिला कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वित्तीय बाबींसंदर्भात प्रशिक्षण, नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, व्याख्यान, परिसंवाद, मुलींचे शिक्षण व संरक्षण आदी कार्यक्रम वर्षभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली.
वेबिनारचे आयोजन..
आज आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये जिल्हयातील महिला शिक्षिका, शिक्षणतज्ञ, प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पालक व विद्यार्थी यांचा समावेश होता. या वेबिनारमध्ये नांदेड तालुक्यातील काकांडी व माहूर तालुक्यातील वानोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जिवनपटावर आधारीत उत्कृष्ट एकांकिका सादर केल्या.
जिल्हा परिषेदेतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार..
तसेच, यावेळी जिल्हा परिषदेतील महिला अधिकारी व कर्मचा-यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उप मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.सुधिर ठोंबरे यांनी मानले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकरी डि.यू. इंगोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर, परिहार, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, बंडू आमदूरकर, डॉ. अरविंद गायकवाड, छाया कांबळे, वैशाली थोरात, इंदू वाघमारे, प्रमिला चौदंते यांच्यासह जिल्हा परिषदेतील खाते प्रमुख, महिला अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
हेही वाचा : नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या- जिल्हाधिकारी