नांदेड - केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्यावतीने मंगळवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काळे झेंडे, फलक घेवून मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेवून कायद्याची होळी करण्यात आली. मोदी-शाह मुर्दाबाद, एनआरसी मागे घ्या, 'तब लढे थे गोरोंसे अब लढेंगे चोरोसे' या घोषणांनी अर्धापूर शहर दणाणून गेले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा - विद्यार्थ्यांवर हल्ला हे गृहमंत्रालयाचे अपयश; खासदार सुप्रिया सुळे
अर्धापूर शहरातील बाजार मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. पोलीस ठाणे, बसस्थानक परिसर, बसवेश्वर चौक मार्गे तहसील कार्यालयाच्या परिसरात हा मोर्चा गेला. मोर्चेच्या वतीने एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना विधेयक रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
तहसील कार्यालयाच्या समोर एका निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कायद्याला कडाडून विरोध करण्यात आला. केंद्र सरकारच्या 'फोडा आणि राज्य करा' या नितीवर टीका करण्यात आली. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध संघटनेचे पदाधिकारी, तरुण खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा - काँग्रेस पक्षाचा 28 डिसेंबरला ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा