नांदेड Nanded Patient Death Case : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या घटनेनंतर शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात भेट देत पाहणी केली. यावेळी रुग्णालयात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं पाहिल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांची एक धक्कादायक कृती समोर आली आहे. या खासदारांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना चक्क स्वच्छतागृह साफ करायला लावलंय. इतकंच नाही तर हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला यावरुन चांगलेच खडेबोलही सुनावले आहेत.
मी माझ्या मागणीवर ठाम आहे. रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्यानं रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - हेमंत पाटील, खासदार शिंदे गट नांदेड
रुग्णालय अधिष्ठात्यांना साफ करायला लावलं शौचालय : खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात घाणीचं साम्राज्य दिसून आलं. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावलं आहे. यावेळी हेमंत पाटील यांनी पाईप धरुन पाणी मारलं, तर रुग्णालय अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावलं आहे. आपल्याला अजूनही साफसफाई करायची असल्याचं हेमंत पाटील या व्हिडिओत बोलत असताना स्पष्ट होत आहे.
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 36 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं अनेक राजकीय नेते आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडं धाव घेत आहेत. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटलांनी देखील रुग्णालयाला भेट दिली. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला. यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृह हे घाणेरड्या स्थितीत होतं. तसंच अनेक शौचालय ही ब्लॉक असल्याचं दिसून आलं तर काही ठिकाणी स्वच्छतागृहे नव्हती, असं खासदार हेमंत पाटलांनी म्हटलंय. या रुग्णालयात सर्व अनागोंदी कारभार सुरू असून दोषींवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडं करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर : नांदेड शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडालीय. या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय. ही चौकशी समिती चौकशी करण्यासाठी रुग्णालयात येणार आहे. रुग्णालयात चौकशी समिती येणार असल्यानं शासकीय रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तसंच रुग्णालय परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून सकाळपासून स्वच्छता सुरू आहे.
हेही वाचा :