नांदेड - नांदेड-मुंबई- नांदेड रेल्वे आता उद्यापासून दररोज धावणार आहे. ही विशेष रेल्वे नंदीग्राम एक्स्प्रेसच्या वेळेत धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या रेल्वेत केवळ आरक्षित प्रवाशांनाच प्रवेश मिळणार आहे. नांदेड ते मुंबई अशी नियमित रेल्वे सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यापूर्वीच 22 मार्चला रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता अनलॉकच्या विविध टप्प्यांत विशेष रेल्वेगाड्या सोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड विशेष सुपरफास्ट गाडी सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी परभणी - नांदेड हैदराबाद ही विशेष एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात अनलॉक -५मध्ये नांदेडहून मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस तसेच नांदेड - पुणे एक्स्प्रेस सुरू करण्याचे रेल्वे विभागाने जाहीर केले होते. याशिवाय आवश्यकतेनुसार काही अन्य रेल्वेगाड्या देखील सुरू केल्या जातील, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. सोमवारपासून नांदेड - मुंबई - नांदेड ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही रेल्वे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी सुटून दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना परतूर, सेलू, मानवतरोड, परभणी, पूर्णा मार्गे नांदेडला पोहचेल. त्यांनंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता ही रेल्वे नांदेडवरून मुंबईला प्रस्थान करेल. या रेल्वेगाडीला एकूण १८ डबे असतील. ज्यात सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर तसेच सिटिंग अशा आसन आरक्षणाची सुविधा आहे. प्रवाशांना चेहऱ्यावर मास्क आणि कोविडसंदर्भात राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.