नांदेड - शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय आता शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. दुधाला सध्या सरासरी बावीस रुपये लिटर इतका अत्यल्प भाव मिळत आहे. तर गुरांना लागणारा चारा आणि इतर खाद्य यांचे दर भडकलेले आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय आता न परवडणारा धंदा झाला आहे. लॉकडाऊनमुळे दुधाचा व्यवसाय मोडकळीस आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. दुधाचे दर प्रती लिटर तब्बल 10 ते 12 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पाण्याच्या भावात दुध विकले जात आहे. दूध उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
हेही वाचा - नियंत्रण रेषेवरून मागे जाण्यास चीनचा नकार; दिर्घकालीन संघर्षासाठी लष्कराची तयारी
शेतीला जोडधंदा म्हणून बळीराजा शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळला. मात्र, आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून संपूर्ण देशभरात कोरोना विषाणुने थैमान घातल्याने देशात तब्बल 80 दिवस लॉकडाऊन होता. याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकर्यांना बसला असून दुधाचे खरेदी दर हे खासगी दूध संकलकांनी तब्बल 12 रूपयांनी कमी केले आहेत. यामुळे दुधाचे दर हे 32 रूपये लिटर वरून थेट 22 ते 25 रूपये लिटरवर आले आहेत.
जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किमती आणि चार्याचा विचार केला, तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 ते 30 रुपयांचा खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या 22 रुपये लिटर ने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराकही लॉकडाऊनमुळे वेळेवरती मिळत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत आहे. याचा देखील मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. साधारणपणे एका जनावराला अडीचशे रुपयाच्या जवळपास खर्च येतो. तर केवळे दोनशे रुपयांचे दूध उत्पादन होते. यामुळे दूध व्यवसाय संपूर्णत: मोडकळीस आला असून सरकारने आम्हाला मदत द्यावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - महिलांची लष्करात कायमस्वरुपी नियुक्ती; केंद्र सरकारने जारी केला आदेश..