नांदेड - शीला किशोर भवरे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन महापौरांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या १ जूनला सकाळी ११ वाजता होणाऱ्या मनपाच्या विशेष सभेत नव्या महापौरांची निवड केली जाणार आहे. दरम्यान महापौर पदाच्या शर्यतीत ज्योती सुभाष रायबोळे आणि पुजा पवळे यांची नावे आघाडीवर आहेत.
पक्षांतर्गत करारानुसार शीला किशोर भवरे यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे नुकताच त्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या महापौरपदी निवड करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्याकरीता येत्या १ जूनला मनपाची विशेष सभा बोलावण्यास सांगितले आहे. त्यानुसार १ जूनला नव्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. महापौर पद हे अनुसुचित जाती (महिला) साठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
दरम्यान महापौरपदाच्या शर्यतीत काँग्रेसच्या दिक्षा कपील धबाले, ज्योती सुभाष रायबोळे, पुजा पवळे आणि गंगाबाई कदम यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ज्योती रायबोळे किंवा पुजा पवळे या दोन नावापैकी एका सदस्याचे नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.