नांदेड- गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. येत्या ४८ तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसाळा सुरु झाला तरी पावसाची अवकृपा होती. दीड महिना लोटला तरी अपेक्षेइतका पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदील झाला होता. खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे शेतकऱयांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात परिणामकारक पाऊस न झाल्याने नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशयात कोणतीही वाढ झाली नाही.
रविवारी रात्री काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली. सकाळी शहर व परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शहरात तर सूर्यदर्शनही घडले नाही. या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी सुरु असलेली पावसाची रिपरिप सोमवारी आणि मंगळवारीही सुरूच आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात मुबलक पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पाणीसाठ्यात भरीव वाढ होणार आहे.