नांदेड - राज्याच्या काही भागात पावसाचे थैमान सुरु आहे. असे असले तरी नांदेड जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठणचे जायकवाडी धरण ८० टक्के भरल्याने या धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात १ जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी मोसमात अधूनमधून लावलेली पावसाची हजेरी वगळली तर नांदेडकरांना आतुरतेने पावसाची वाट पाहावी लागली. जवळपास ४० दिवसानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ४ ते ६ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. तर अन्य तालुक्यातही पावसाने दिलासा दिला होता. ऑगस्टच्या पहिल्या ८ दिवसात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्यानंतर मात्र ४ दिवस झाले पावसाचा पत्ता नाही. गत २ दिवसांपासून तर उन्हाळयासारखे ऊन पडत आहे. त्यामुळे पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
११ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यात झालेला एकूण पाऊस
नांदेड - ४६ टक्के, मुदखेड - ५९ टक्के,
अर्धापूर - ४५ टक्के, भोकर - ४८ टक्के,
उमरी ४४ टक्के, कंधार - ५१ टक्के,
लोहा - ४४ टक्के, किनवट - ५१ टक्के,
माहूर - ५० टक्के, हदगाव - ४६ टक्के,
हिमायतनगर - ५३ टक्के, देगलूर - ३२ टक्के,
बिलोली - ५१ टक्के, धर्माबाद - ४८ टक्के,
नायगाव - ४८ टक्के , मुखेड - ४४ टक्के
आजघडीला सर्वात कमी पाऊस देगलूर तालुक्यात झाला असून सर्वाधिक ५९ टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात नोंदविला गेला.
जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
जायकवाडी धरण ८० टक्क्याहून अधिक भरले आहे. त्यामुळे अतिरिक्त जलसाठा ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ पासून विसर्ग करणार असल्याचा संदेश विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयालास मिळाला. त्यानुसार गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या जलमार्गात येणारे धरणाचे सर्व दरवाजे आवश्यकतेनुसार संचलित करण्यात यावेत, स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, वेळोवेळी कुठल्याही प्रकारची मदत वा गरज पडल्यास जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयांना विनाविलंब कळविण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा पूर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन वर्कशॉप कॉर्नर, नांदेड हे २४ तास कार्यरत आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२६३८७० असा आहे. तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक ०२४६२-२३४७२०, मनपा नियंत्रण कक्ष क्रमांक ०२४६२-२६२६२६, जिल्हा नियंत्रण कक्ष ०२४६२-२३५०७७ असा आहे. या सर्व क्रमांकांवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.