नांदेड - जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट देखील झाली असून, अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, बिलोली, हदगाव, अर्धापूर, मुदखेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला. बिलोली तालुक्यात वादळामुळे अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडाली, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. गारपिटीमुळे उन्हाळी ज्वारीसह भाजीपाला तसेच केळींच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
बिलोली तालुक्यातील खतगांवमध्ये वादळी वाऱ्याने दाणादाण उडवली. गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक घरांचे प्रचंड नुकसान झालं. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, त्यामुळे नागरिकांना रात्र उघड्यावरच काढावी लागली.
पंचनामे करून मदतीची मागणी
वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा अडव्या झाल्या आहेत, उन्हाळी ज्वारीसह पालेभाज्यांच्या पिकांना देखील गारपीटीचा फटका बसला, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले असून, शासनाने पंचनामे करून, तातडीने मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - पप्पांनी, केंद्राकडे तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला