नांदेड - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने पक्षामध्ये बदल करण्यास सुरूवात केली आहे. या बदलानुसार नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर शिला भवरे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर भवरे यांच्या ठिकाणी दीक्षा धबाले यांची निवड करण्यात आली. धबाले यांनी पदभार स्विकारताच उपमहापौर विनय गिरडे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी लवकरच उपमहापौराची निवड करण्यात येणार आहे.
नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर शिला भवरे यांना बदलून दीक्षा धबाले यांची निवड शनिवारी करण्यात आली. धबाले यांनी महापौर पदभार स्विकारताच उपमहापौर विनय गिरडे पाटील यांनी आपला राजीनामा सादर केला. तो तातडीने महापौर यांनी मंजूर केल्यामुळे नवीन उपमहापौर यांची निवडही लवकरच होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अनेक बदल करण्यात येत असून विविध पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात येत आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला फटका लक्ष्यात घेता काँग्रेसकडून सोशल इंजिनियरिंगचा फॉर्म्युला राबविण्यात येत आहे. त्यामुळे उपमहापौर नेमतानाही तोच आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. उपमहापौर पदासाठी प्रशांत पाटील तिडके, सतिष देशमुख तरोडेकर, जयश्री पावडे, किशोर स्वामी यांची नावे चर्चेत आहेत.