नांदेड - जिल्ह्यात 22 मे पासून प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) आणि गर्दीची ठिकाणे वगळता इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व नियमांचे पालन करुन बाजारपेठ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये शारीरिक अंतर न राखल्यास दुकान बंद करून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. ग्राहकांना दुकानातच थांबावे लागेल, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा देता येईल. हॉटेल व इतर उपहार गृह यांना स्वयंपाकगृह सुरू ठेवता येईल. शारीरिक अंतर न ठेवल्यास, थुंकल्यास, मास्क न वापरल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड लागणार आहे. दुचाकीवर एकजण, ऑटोमध्ये चालक आणि दोन व्यक्ती, चारचाकी वाहनात चालक आणि दोन व्यक्ती याप्रमाणे वाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक बस ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली असून समारंभातील उपस्थितांची मर्यादा २० वरून ५० वर नेली आहे.
खालील ठिकाणे बंदच राहणार -
- चहा टपरी, पान टपरी
- विमान, रेल्वे प्रवास
- शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून)
- शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल
- सामाजिक/धार्मिक कार्यक्रम
- व्यायामशाळा, जल तरणिका
- सर्व धार्मिक स्थळे
- हॉटेल/रेस्टारंट/बार/धाबे
- आठवडी बाजार
- शीतपेयांची दुकाने
- तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री
काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. आपण कोरोनासोबत लढून जगतो आहोत, याचे भान प्रत्येक वेळी असू द्या, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.