नांदेड : शार्पशूटरच्या शोधासाठी नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यांत जाऊन आली होती. आता शूटरच्या अटकेमुळे बियाणी यांच्या हत्येसह इतर घटनांतील अनेक बाबी समोर येणार आहेत. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची खंडणीच्या कारणावरून हरविंदर सिंग रिंदा याच्या साथीदाराने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते.
आरोपीवर विविध राज्यांमध्ये २५ गुन्हे एनआयएने पकडलेल्या दिपक सुरेश रांगा या आरोपीच्या विरोधात देशभरातील विविध राज्यांमध्ये २५ गुन्हे दाखल आहेत. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश असून आता महाराष्ट्रातही गुन्हा नोंद झाला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे एसआयटीच्या पथकासह मागील काही दिवसांपासून परराज्यात तळ ठोकून होते. संजय बियाणी खून प्रकरणातील शुटर पकडला गेल्याने खुनामध्ये नेमके कोण? याचा धागा पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रकरणातील आरोपींची संख्याही वाढू शकते.
आरोपी देत होता गुंगारा : एका महिन्यापूर्वी गुजरातमधून एका शूटरला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या दीपक सुरेश रांगा हा यंत्रणांना गुंगारा देत होता. दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक नांदेड शहर सोडून जात होते. बियाणी यांच्या हत्येतील शार्पशूटरला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी सहा आरोपींना अटक: संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणात नांदेड पोलिसांनी मोठा उलगडा केला आहे. याप्रकरणात नांदेड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. पाच एप्रिलला संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या घराससमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येंनतर पोलिसांविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तेव्हापासून याप्रकरणाचा पोलीस तपास करत होते. पोलिसांनी महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगाणा व कर्नाटक या राज्यात तपास केला होता. तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न झाले आहेत. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यामध्ये इंद्रपालसिंग ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर (वय ३५ वर्ष), मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे (वय २५ वर्ष), सतनामसिंग ऊर्फ सत्ता पि दलबिरसिंघ शेरगिल (वय २८ वर्ष), हरदिपसिंध ऊर्फ सोनु पिनीपाना पि. सतनामसिंध बाजवा (वय ३५ वर्ष), गुरमुखसिंध ऊर्फ गुरी पि. सेवक (वय २४ वर्ष), करणजितसिंघ पि. रघबिरसिंघ साहु (वय ३० वर्ष), सर्व रा. नादेंड, अशी आरोपींची नावे आहे.