नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील तामसा मार्गावर असलेले दोन दवाखाने, किराणा दुकान व कृषी सेवा केंद्र यांचे शटर तोडून जवळपास २५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी पसार केली. चोरीचा हा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील तामसा मार्गावर असलेले डाॅ. गजानन कड यांच्या 'परी' रुग्णालयात अज्ञात तीन चोरट्यांनी शटर तोडून अंदाजे १५ हजार रुपये चोरले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर राजेश मामीडवार यांचे अक्षय किराणा दुकान तोडून नगदी ५ हजार रुपये, डाॅ. शिवाजी देशमुख यांच्या कामाई मेडीकल येथील नगदी ४ हजार ३०० रुपये अशा तिन्ही ठिकाणी शटर तोडून रोख २५ हजार लंपास केले.
वसंत कदम यांच्या कृषी केंद्राचे व हनुमंत राजेगोरे यांच्या सद्गुरू अग्रो क्लिनिकचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे व्यापारी व नागरिकांत चांगलीच दहशत पसरली आहे. मात्र, हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून तीन चोरटे सहज शटर तोडून चोरी करताना दिसून येत आहेत. या घटनेची पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे व त्यांचे कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.नांदगावकर, विद्यासागर वैद्य, जमादार हेमंत देशपांडे, पी.जे.कदम, संजय कळके, माधव गिते यांनी घटनास्थळ पंचनामा केला. यावेळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकांनीही पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगावकर करीत आहेत.
या चोरीच्या घटनेने शहरात दहशत निर्माण झाली असून शहरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.