नांदेड - आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली असून, पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत. अनेक विठ्ठलभक्त वारकऱ्यांना दिंडीने पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आषाढी एकादशीपूर्वी बसने पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यावर्षीही आषाढी एकादशीचा उत्साह पाहता, महामंडळाच्या नांदेड विभागातून अडीचशे बसचे नियोजन केले आहे.
येत्या २३ जून ते ५ जुलै या काळात या बस भाविकांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. २९ जून हा आषाढी एकादशीचा मुख्य दिवस असून, ३ जुलै रोजी पौर्णिमा महाद्वारी काल्याचा कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही उत्सवांना भाविकांना उपस्थित राहता यावे, या दृष्टीने महामंडळाने नियोजन केले आहे. पंढरपूर यात्रेसाठी प्रत्येक आगारातून बस सोडल्या जाणार आहेत. कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील केली आहे
५० प्रवाशांचा ग्रुप झाल्यास गावापासून सेवा - ५० प्रवाशांचा ग्रुप तयार झाल्यास त्यांच्या गावापासून बससेवा दिली जाणार आहे. आगार वगळता अर्धापूर, तामसा, बारड, मुदखेड, उमरी, मांडवी, धर्माबाद, कुंडलवाडी, नर्सी, लोहा, बान्हाळी या ठिकाणांहून प्रवासी उपलब्ध झाल्यास जादा बस दिल्या जाणार आहेत. असे विभाग नियंत्रक दत्तात्रय कुलकर्णी यांनी सांगितले.
पंढरपूरसाठी कोणत्या आगारातून किती बस ?
नांदेड :५०
भोकर :२६
किनवट :१६
मुखेड :३६
देगलूर :३१
कंधार :३६
हदगाव :२१
बिलोली :२६
माहूर :०८
नांदेड जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाची परंपरा अनेक वर्षांची आहे. जिल्ह्यातून विविध भागातून अनेक दिंड्या तसेच भाविक जात असतात. आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक हे एसटीने प्रवास करतात. त्यामुळे वाट पाहीन पण एसटीने जाईन अशी भावना ग्रामीण भागातील तथा शहरातील वारकरी मध्ये आहे. त्यामुळे एसटीला आषाढीनिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते. पण यंदा एसटी महामंडळाकडून योग्य नियोजन करत जिल्ह्यातून अडीचशे बसेस हे पंढरपूर यात्रा स्पेशल सोडण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. एसटीचा प्रवास सुखरूप असून सरकारचे उत्पन्न वाढवणार आहे. त्यामुळे एसटी प्रवासाने जात असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बस स्थानकावर पंढरपूरला जाण्यासाठी हळूहळू गर्दी आता वाढत आहे.