नांदेड - लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे हे भाजपच्या तिकीटावर बहुमताने विजयी झाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी धार्मिक स्थळांना भेटी देऊन मुलासाठी केलेले नवस फेडण्यास सुरुवात केली आहे. राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी दुपारी रणरणत्या उन्हातच माहुर गडावर येऊन रेणुका मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
रेणुकादेवी हे विखे पाटलांचे श्रद्धास्थान आहे. वर्षातून किमान दोन-तीनवेळा ते माहूरला भेट देतात. नवरात्रीत तर त्याची हमखास वारी असते, सुजय विखे पाटलांच्या विजयासाठी त्यांनी रेणूकामातेला साकडे घातले. त्यानंतर सुजय विखे विजयी झाल्यानंतर ते शनिवारी रेणुकामातेच्या दर्शनासाठी आवर्जून आले. मात्र, या दौऱ्यातही त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले. निवडणुकीपूर्वी आल्यावरही त्यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बोलणे टाळले होते. दरम्यान, अशोक चव्हाण पराभूत होतील, असे राज्यात कोणाला वाटले नाही, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी यावेळी सोबतच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना दिली.