नांदेड - जमीनीच्या वादातून चुलत भावांनी चुलत भावावर गोळीबार व तलवारीने हल्ला केल्याची घटना आज दुपारी 3 च्या सुमारास देगलूर नाका परिसरातील गाडेगाव रोड भागात घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्याची गुढी उभारा - पोलीस अधीक्षक
याबाबत अधिक माहिती अशी की, देगलूर नाका परिसरात राहणाऱ्या इनामदार कुटुंबियांमध्ये मागील अनेक वर्षापासून जमीनीचा वाद होता. या जुन्या वादावरून 25 मार्चला सकाळी किरकोळ भांडण झाले. मात्र, भांडण मिटल्यानंतर दुपारी पुन्हा 3 च्या सुमारास इनामदार कुटुंबातील सदस्यांनी हाजी फारुखी, मो. जुनेद फारुखी, अली फारुखी यांच्यावर तलवारीने हल्ला करत गोळीबार केला.
यामध्ये मो. जुनेद याचा जागीच मृत्यू झाला. तर हाजी फारुखी व अली फारुखी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत जुनेद फारुखी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा - कोरोना विरुद्ध लढण्याची गुढी उभारू - अशोक चव्हाण