नांदेड - महानगरपालिका हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या पथकाने आज बुधवारी दुकानदारासह मास्क न लावणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करून 36 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर दुकानदार धास्तावले आहेत.
महानगरपालिकेने शहरातील सहा झोनमध्ये प्रत्येकी एक पथक कार्यान्वित केले आहेत. वजिराबाद येथे असलेले पथक क्र. 4 यांनी शहरासह चिखलीवाडी भागात सोशल डिस्टन्सिंग न पाळलेल्या चार दुकानदारांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे असे एकूण 20 हजार रुपये व मास्कचा वापर न केलेल्या सहा जणांकडून प्रत्येकी 1 हजार रुपये, असे एकूण 26 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
तसेच अशोकनगर येथे कार्यान्वित असलेले पथक क्र. 2 यांनी सामाजिक अंतराचा फज्जा उडवणाऱ्या दुकानदारांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये, असा 10 हजारांचा दंड वसूल केल. पथक क्र. 2 व 4 मिळून एकाच दिवसात एकूण 36 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सुधीर इंगोले, विलास भोसीकर यांच्या नियंत्रणाखाली पथक प्रमुख आर. के. वाघमारे, वसंत कल्याणकर यांनी केली.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी