नांदेड - अशोक चव्हाण यांनी विकास कामाच्या नावावर मतदान मागायला पाहिजे. इतक्या वर्षात विकास का केला नाही. त्यामुळे दुसऱ्यावर टीका करून मतदान मागायची वेळ त्यांच्यावर आली आहे. पैशांच्या जोरावर मतदान मागतील, पण धनशक्तीकडे नाही तर जनशक्तीला मतदान करावे. स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार म्हणून भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाच बहुमताने निवडून द्यावे असे, आवाहन खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी केले आहे.
हेही वाचा - ....खरे तर आरामाची गरज भाजपच्या उमेदवारालाच - अशोक चव्हाण
येळेगाव येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खा. चिखलीकर पुढे बोलताना म्हणाले की, येळेगावला एक कोटी ६५ लाख रुपयांची योजना आम्ही मंजूर केली. अशोकराव चव्हाण म्हणतात की, भोकर मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या योजना आम्ही मंजूर केल्या. पण, त्यांची सत्ता असताना कोणी त्यांचे हात बांधले होते का? निव्वळ खोट बोलून राजकारण सुरू आहे. जिल्ह्यातील खोटारडेपणाचा पुरस्कार त्यांना द्यावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
एकही गाव असे नाही की, ज्या गावात विकासाचा खोटा नारळ फोडला नाही. सत्ता असताना अशोक चव्हाण काही करू शकले नाहीत. तर सत्ता नसताना ते काय विकास करतील. याचा विचार या भागातील मतदारांनी केला पाहिजे. जिल्ह्यात रेल्वे व रस्त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. विकास करण्यासाठी जसा भाजपचा खासदार दिला. तसाच विकासाचा रथ पुढे चालू ठेवण्यासाठी आमदारही निवडून दिला पाहिजे. इसापूर धरणाचे एक थेंबही पाणी पळवले तर मी पुन्हा मतदान मागणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - एमआयएम आणि 'वंचित'च्या काडीमोडास इम्तियाज जलील कारणीभूत - प्रकाश आंबेडकर
यावेळी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे, निलेश बारडकर, बबनराव बारसे, धर्मराज देशमुख, किशोर देशमुख, नागोराव इंगोले, संतोष कपाटे, अमोल कपाटे, प्रभू कपाटे, आत्माराम कपाटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, चिखलीकर यांनी बामणी, मेंढला खु., मेंढला बु., गणपूर आदी गावांना भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मालेगाव येथेही त्यांची जाहीर सभा झाली.