नांदेड - सिडको वसाहतीअंतर्गत असलेल्या एनडी ४२, डी-३ भागातील ३० वर्षीय तरुणीचा घरात घुसून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 'शादी डॉट कॉम' वरुन या दोघांची ओळख झाली होती.
दीपनगर येथील रोहन रमेश धनंजकर हा ११ एप्रिलला पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरासमोर आला. त्यानंतर त्याने तरुणीच्या घराचे दार वाजवले. एवढ्या मध्यरात्री आपल्या घराचे दार कोण वाजवत आहे म्हणून तरुणीच्या आईने दरवाजा उघडला. त्याचवेळी, रोहन धनंजकर हा तरुणीच्या घरात गेला.
यावेळी त्याने तुम्ही मला समजून घ्या, तुम्ही माझ्याविषयी काहीतरी गैरसमज करून घेत आहात. माझे लग्न झालेले नाही, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणून वाईट हेतूने सदर तरुणीचा विनयभंग केला. दरम्यान, घाबरलेल्या पीडित तरुणीने त्यास प्रतिकार करून आरडाओरड केली. त्यामुळे तरुणाने पीडितेस व तिच्या आईस शिवीगाळ करत तुझे लग्न माझ्याशिवाय इतर कुणाशी होऊ देणार नाही. तसेच तुला जिवंत सोडणार नाही. वेळप्रसंगी तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून मी स्वत: मरून तुम्हाला जेलमध्ये पाठवतो, अशी धमकी देऊन तो निघून गेला, असा आरोप पीडित तरुणीने आपल्या केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार डी. एन. मोरे यांनी दिली.
विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी रोहण धनंजकर याचे लग्न झाले असून त्याला ३ अपत्य आहेत, असा उल्लेखही पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत दिले असल्याचेही डी. एन. मोरे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू आहे.