नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळातील जनकल्याणांच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे 'मोदी महाजनसंपर्क अभियाना'चे आयोजन देशभर करण्यात आले आहे. महाराष्ट्रतील या अभियानाची सुरुवात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या जाहीर सभेने नांदेडपासून होणार आहे. नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही माहिती दिली आहे.
असा असेल शाह यांचा दौरा : शनिवार 10 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातहून नांदेडकडे रवाना होणार आहेत. नांदेड विमानतळावर सायंकाळी 5 वाजता त्यांचे आगमन होईल. विमानतळाहून थेट ते सभास्थळी रवाना होतील. महाराष्ट्रातील मोदी महाजनसंपर्क अभियानाचा शुभारंभ नांदेडपासून करण्यात येणार असल्यामुळे अमित शाह यांची ही सभा जंगी करण्याचे नियोजन जिल्हा भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.
हे मान्यवर राहतील उपस्थित : 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नांदेड शहरातील बाफना चौकाजवळील अबचलनगर येथील मोकळ्या मैदानावर सभा होईल. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, जनसंपर्क अभियानाचे मराठवाडा प्रमुख आमदार प्रविण दरेकर, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपचे शहर महानगराध्यक्ष प्रविण साले, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार आदींची उपस्थिती लाभणार आहे.
सभा गाजणार की...? : नांदेड जिल्ह्याच्या नऊ विधानसभा मतदारसंघात केवळ तीन जागेवर भाजपला विजय प्राप्त करता आला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अंतर्गत वादामुळे अनेक ठिकाणी भाजपची पिछेहाट झाली. हा वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला कारणीभूत ठरतो काय, अशी चर्चा भाजपाच्या जुन्या, नव्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. भाजपअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असला तरी खासदार प्रताप पाटील चिखलीकर ही सभा यशस्वी करण्यासाठी एकाकी झुंज देत आहे. यामुळे शहा यांची सभा गाजणार की वादग्रस्त ठरणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
- Devendra Fadnavis : 'भीमा-कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर..', देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
- Rohit Pawar Criticized: रोहित पवार स्वपक्षीयांवरच कडाडले, शरद पवारांच्यावर बोलणाऱ्यांविरोधात नेते गप्प का, रोहित पवारांचा सवाल
- Sharad Pawar News: पवारांच्या एकेरी उल्लेखानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; भाजपच्या नेत्यांचे कुत्रीच्या तोंडावर लावले फोटो