नांदेड - भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाच्या सत्ता स्थापनेला आता बरेच दिवस लोटले आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील खासदारांच्या हालचाली वाढल्या आहेत. दोन्ही-ठिकाणी मंत्री आपल्या मर्जीतीलच राहावा, याची दक्षता घेत त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. तर इतर आमदारांनी वैयक्तिक पातळीवरुन प्रयत्न चालविले आहेत. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर ( MLA Balaji Kalyankar ) आणि शेवटच्या टप्प्यात हिंगोलीचे खासदार यांनीही बंडाचा झेंडा फडकावत शिंदे यांची सोबत केली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या राजकारणाची कूस बदलली आहे. हेमंत पाटील आणि चिखलीकर यांच्यात तसे फारसे शक्य नव्हते. परंतु या दोघांनीही जुळवून घेतल्याची चर्चा आहे. परंतु दोन्ही जिल्ह्यातील मंत्री पदासाठी मात्र त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
जिल्ह्यात भाजपाचे भीमराव केराम, तुषार राठोड, राजेश पवार आणि विधान परिषदेचे राम रातोळीकर हे चार आमदार आहेत. तर सेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर आहेत. त्यात जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजपाचे वर्चस्व अधिक आहे. त्याचा फायदा मंत्रिपद मिळण्यास होऊ शकतो. त्यादृष्टीने खासदार चिखलीकर यांनी भीमराव केराम यांच्या पारड्यात वजन टाकल्याचे बोलले जात आहे. केराम हे चिखलीकरांसोबत अनेक दिवस मुंबईत तळ ठोकून होते, तर तुषार राठोड, राजेश पवार हे मंत्री झाल्यानंतर वरचढ ठरण्याची शक्यता अधिक आहे. याच कारणामुळे चिखलीकरांचा केराम यांच्या बाजूने अधिक कल असू शकतो. दुसरीकडे या सर्व गोंधळात वरिष्ठ सभागृहातील रातोळीकर यांनाही लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे आमदार कल्याणकर हे हेमंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे पाटील यांनी मंत्री पदासाठी नक्कीच शब्द टाकला असेल. विशेष म्हणजे शिंदे गटात पहिल्याच टप्प्यात सहभागी होणारे कल्याणकर हे होते. त्यामुळे त्यांच्या बाजूने शिंदे यांच्या मनात सहानुभूतीही असू शकते. कल्याणकर हे सुद्धा पाटील यांच्या शब्दाबाहेर जाणारे नाहीत. एकूणच मंत्रिपदाच्या शर्यतीत दोन्ही खासदारांनी आपल्याला वरचढ कुणी ठरु नये, या दृष्टीनेच फासे फेकले आहेत. त्यात 'मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे पाहावे लागेल. त्यासाठी इच्छुकांनी मात्र देव पाण्यात ठेवले आहे.
हिंगोलीसाठीही आग्रही : नांदेडात बालाजी कल्याणकर, तर हिंगोली जिल्ह्यात आमदार संतोष बांगर यांच्या नावावर खासदार पाटील हे आग्रही असू शकतात. बांगर यांनी सुरुवातीला मी मातोश्रीसोबत असल्याचे भाषण करुन अश्रूही ढाळले होते. परंतु नंतर तेही शिंदे गटात गेले. खासदार पाटील यांच्यासोबतही त्यांचे चांगले जमते. त्यामुळे पाटील हे दोन्ही जिल्ह्यात आपल्याच मर्जीतील मंत्री बसविण्यासाठी वजन वापरतील, अशी शक्यता आहे.
हेही वाचा - Shinde Group Vs Shiv Sena : बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आता आदित्य आणि उद्धव ठाकरे ?