नांदेड - केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी पक्ष व इतर संघटना या बंदमध्ये सहभागी होत्या. केंद्र सरकारने तयार केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे तो कायदा मागे घेण्यात यावा, यासाठी विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली. नांदेडमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ही महाविकास आघाडी बंदमध्ये सहभागी होती.
रॅली, निवेदन, धरणे आंदोलन
महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी चौक येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. तर महात्मा फुले चौकात देखील इतर संघटनांनी विरोध दर्शवला. शहरातील बहुतांशी बाजारपेठ बंद होती. तर काही ठिकाणी तुरळक दुकाने सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर डावी लोकशाही आघाडी व समविचारी संघटनांनी धरणे धरले. तर देगलूर नाका येथे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
कृषी उत्पन्न बाजार समितीसह बससेवा होती बंद
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कृषी उत्पन्न बाजार समित्यांनेही पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंदच होत्या. दिवसभर बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाले. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून बस सेवा बंद केली होती. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱया प्रवाशांची गैरसोय झाली. सायंकाळनंतर मात्र काही मार्गावरील बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे खासगी वाहतूक, ऑटो मात्र सुरु होत्या. शहरातील रस्त्यावरील गर्दीही आज तुरळक होती.
या आंदोलनामध्ये माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर मोहिनी येवनकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुनिल कदम आदींचा सहभाग होता. तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी बंदला पाठिंबा देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनात डाव्या लोकशाही आघाडीचे डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. जामकर आदींची उपस्थिती होती. प्रा. राजू सोनाळे, अँड. अविनाश भोसीकर, अॅड . यशोनिल मोगले यांनी फुले पुतळा येथे कृषी कायद्याला विरोध दर्शवला आहे.